मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांचे भूमिपूजन २०२२ मध्ये करण्यात आले होते. मात्र असे असताना याच प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुन्हा एकदा भूमिपूजन करण्यात येत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे नियोजन आणि आराखडा ठाकरे सरकारच्या काळात झाले होते. आधीच सुरू असलेल्या प्रकल्पाचे पुन्हा भूमिपूजन करण्याचा अट्टाहास का करण्यात येत आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित समारंभात हे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमावरून आदल्या दिवशीच राजकारण सुरू झाले आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आधीच झालेले असताना पुन्हा भूमिपूजन कशासाठी करण्यात येत आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून केला आहे.
हेही वाचा : केईएम रुग्णालयात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, केईएम ठरले देशातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याची आधीची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागवण्यात आल्या. मग या प्रकल्पाचा खर्चही वाढला आणि हे काम मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आले, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा : मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
दरम्यान, या प्रकल्पांतर्गत भांडुप पश्चिम परिसरातील हेडगेवार जंक्शन येथे पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन १२ मार्च २०२२ रोजी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची छायाचित्रे ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर टाकली आहेत.