PM Modi Death Threat : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक कंट्रोलला धमक्यांचे फोन येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातच आज (७ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा संदेश मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सॲप नंबरवर आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा धमकीचा संदेश मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सॲप नंबरवर पंतप्रधान मोदी यांना आयएसआय एजंट समावेश असलेल्या धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तसेच हा धमकीचा मेसेच राजस्थान येथील अजमेरमधून आला असल्याची माहिती पोलिसांनी शोधून काढली आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.
दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, हेल्पलाइन आलेल्या संदेशात दोन आयएसआय एजंटचा सहभाग आणि मोदींवर बॉम्ब हल्ला करण्याचा कट रचल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. दरम्यान, याआधीही अशा प्रकारची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस अलर्ट झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये याआधी पोलिसांना असंही आढळून आलेलं आहे की, काही लोक दारूच्या नशेत किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असल्याने असे धमकीचे संदेश पाठवतात. मुंबई पोलिसांना मिळालेले बहुतांश धमकीचे संदेश त्यांच्या एकमेव व्हॉट्सॲपवर येतात. जो ट्रॅफिक पोलीस हेल्पलाइन म्हणून वापरण्यात येतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारी व्यक्ती दारूच्या नशेत असावी किंवा मानसिकदृष्ट्या समस्यांनी ग्रस्त असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.