मुंबई : राज्यातील दोन प्रमुख पक्षांत फुटीनंतरही गत लोकसभेतील विजयाची बरोबरी साधणे आव्हानात्मक बनू लागल्याने महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा जास्तीतजास्त वापर करण्याकडे भर दिला आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ सर्वाधिक लोकसभा जागा असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांत मोदींच्या पाच सभा झाल्या असून पुढील चार दिवसांत आणखी सात सभांचे नियोजन आहे. त्यात नंतरच्या दोन टप्प्यांतील आणखी सभांची भर पडणार असून गतवेळेच्या तुलनेत मोदींच्या सभांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मोदी यांच्या चंद्रपूर, नागपूरजवळ कन्हान आणि वर्ध्यामध्ये जाहीर सभा झाल्या. दुसऱ्या टप्प्यात नांदेड आणि परभणीमध्ये मोदींच्या सभा पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडल्यानंतर शनिवारपासून मोदींचा पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. मोदी यांची २७ एप्रिलला कोल्हापूरला सभा होणार आहे. २९ एप्रिलला सोलापूर, सातारा आणि पुणे मतदारसंघात सभा होणार आहेत. पुण्यात ‘रोड शो’ची तयारी करण्यात आली आहे. तर ३० एप्रिलला माळशिरस, धाराशिव आणि लातूरला सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  या तीन दिवसांत राज्यातील जवळपास दहा मतदारसंघांतील मतदारांवर मोदींची ‘मोहिनी’ पाडण्याचे भाजपचे नियोजन आहे.

हेही वाचा >>> सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा; पित्रोदांच्या ‘वारसा कर’ वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

चौथ्या टप्प्यात नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचे नियोजन आहे. अखेरच्या पाचव्या टप्प्यात मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीची संयुक्त सभा होणार आहे. तर राज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आतापर्यंत पाच जाहीर सभा झाल्या आहेत.

राज्यात गेल्या पाच वर्षांत राजकीय परिस्थितीत आमूलाग्र बदल झाले आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग हाणून पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांत फूट पाडण्याचे डावपेच यशस्वी झाल्यानंतरही त्याचा जास्त राजकीय फायदा उचलणे भाजपला जमलेले नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. उलट बंडखोरी, ग्रामीण भागांतील प्रतिकूल वातावरण यांमुळे महाराष्ट्रातील गतवेळेचे संख्याबळ घटण्याची महायुतीला भीती आहे. राज्यांतर्गत मुद्दय़ांभोवती फिरत असलेल्या या निवडणुकीला राष्ट्रीय स्तरावरील मुद्दय़ांपर्यंत  आणण्यासाठी मोदींच्या जास्तीत जास्त सभा आयोजित करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जास्तीतजास्त सभा कशासाठी?

* उत्तरप्रदेशपाठोपाठ सर्वाधिक ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रातील ४५ जागा जिंकण्याचे महायुतीचे लक्ष्य. त्याकरिता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अधिकाधिक सभांचे नियोजन.

* महायुतीचा प्रत्येक उमेदवाराकडून मोदींच्या सभेची मागणी. त्यामुळे दोन-तीन मतदारसंघांसाठी मिळून सभांची आखणी. * महाविकास आघाडीबद्दलची सहानुभूती मोडून काढण्याचा हेतू.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi held 5 rallies in first two phases and 7 more planned in next four days in maharashtra zws
Show comments