मुंबई : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्याची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ३ मे ते शनिवार, १० मे, या कालावधीत जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वरीचे पारायण, सकाळ आणि सायंकाळी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने, श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन, ज्ञानेश्वरीचे प्रवचन, सामुदायिक हरिपाठ आणि गायकांची संगीत सेवा व भारूड आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला संस्थानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण, अद्याप तारीख आणि वेळ निश्चित झालेली नाही. पिंपरी – चिंचवड येथील क्रांतीकारक चाफेकर बंधू यांच्या वाड्याचा पुनर्विकास करण्यात आला आहे. त्याचे लोकापर्ण करण्यासाठी एप्रिल मध्यात पंतप्रधान मोदी यांचा पिंपरी – चिंचवड दौरा होणार आहे. या दौऱ्यात आळंदी येथील कार्यक्रमाची तारीख आणि वेळ निश्चित होणार आहे. त्या नंतर उद्घघाटनाच्या कार्यक्रमांची रुपरेषा रीतसर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख योगी निरंजननाथ यांनी दिली.
वारकरी सांप्रदायात आळंदीला महत्त्व
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया | विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
असे आळंदीचे वर्णन अभंगात आहे. शिवाय संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १२९६ साली आळंदीत जिवंत समाधी घेतली होती. ल्यामुळे वारकरी संप्रदायात आळंदीला मोठे महत्त्व आहे. पंढरपूरनंतर वारकरी सांप्रदायाचे दुसरे पवित्र तीर्थस्थळ मानले जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळंदीला येणे ही वारकरी सांप्रदायामधील महत्त्वाची घटना ठरणार आहे.