पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मुंबईच्या बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यामधून जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तसेच, मुंबईत सत्ता आल्यास मुंबईचा कायापालट करू, असं आश्वासनही मोदींनी यावेळी दिलं. यावेळी मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर मोदींनी मेट्रोमधून प्रवासही केला.या प्रवासादरम्यान मोदींनी काही विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या संवादादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांना प्रवासातून वाचणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक सल्लाही दिला आहे.
मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो ७ आणि मुंबई मेट्रो २ अ या मार्गिकांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी मेट्रोमधून प्रवासदेखील केला. या प्रवासादरम्यान मोदींनी काही नागरिकांसोबतच काही विद्यार्थ्यांसोबतही प्रवासात गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांना योगा करण्याचा सल्ला दिला आहे.
काय झालं संभाषण?
नव्या मेट्रो मार्गिकेमुळे वाचणाऱ्या वेळाचा सदुपयोग करण्याचा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
मोदी – मेट्रोमुळे किती वेळ वाचेल?
विद्यार्थी – एक-दीड तास
मोदी – येण्या-जाण्याचा दोन्ही बाजूंचा?
विद्यार्थी – नाही एकाच बाजूचा
मोदी – किती वेळ वाचेल?
विद्यार्थी – कमीत कमी ४५ मिनीट
मोदी – मग बराच वेळ वाचेल
विद्यार्थी – हो
मोदी – मग त्याचा काय उपयोग कराल?
विद्यार्थी – अभ्यास करू
मोदी – अच्छा माझ्यासाठी एक काम करू शकाल?
विद्यार्थी – हो करू सर
मोदी – वेळ वाचतोय, तर कमीत कमी १५ मिनीट योगा कराल?
विद्यार्थी – करू ना सर
मोदी – नाही करणार तुम्ही
विद्यार्थी – करू ना सर..
मोदी – फार अवघड काम आहे..
विद्यार्थी – करू ना सर..
मोदी – कारण ते स्वत:ला करावं लागतं..
Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलबुर्गीमध्ये वाजवला ढोल, सोशल मीडियावर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. मात्र, या संवादाआधी बीकेसी मैदानावर मोदींनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच, मुंबई महानगर पालिका निवडणुकांचं रणशिंगही मोदींनी यावेळी फुंकलं.
“डबल इंजिनच्या सरकारमुळेच मुंबईचा विकास”
“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होतो आहे. मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपाचं सरकार असो किंवा एनडीएचं सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकारण कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही”, असं मोदी यावेळी म्हणाले.