मुंबई : महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, सक्षम वर्तमान आहे आणि समृद्ध वर्तमान आहे. अशा या महाराष्ट्राला येत्या काही वर्षात जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविले जाईल. जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून महाराष्ट्राचा विकास केला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले.

गोरेगाव येथील नेस्को एक्सझिबिशन सेंटर येथे आयोजित राज्यातील २९ हजार कोटींच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन, शुभारंभ आणि लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. मागील काही वर्षांत विरोधकांनी आमच्याबाबत अपप्रचार केला आहे. मात्र तरीही आमचे सरकार भारताला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहे. आज मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होत आहे, पायाभूत सुविधांचा विकास होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील दुहेरी बोगदा आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे – बोरिवली दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन, तरुणांना उद्याोग क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी, त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. ५५४० कोटींच्या या योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. याबरोबरच अन्य काही प्रकल्पाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. मुंबईची दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी आणि प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचे, कामाचे कौतुक पंतप्रधानांनी यावेळी केले.

हेही वाचा >>> Anant – Radhika Wedding : मुंबई दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदींची अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात हजेरी, वरपिता मुकेश अंबानींकडून जंगी स्वागत!

दहा वर्षांतील आपल्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा पाढाही पंतप्रधानांनी यावेळी वाचला. वारकऱ्यांना मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत वारकऱ्यांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या रस्ते प्रकल्पाच्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. आतापर्यंत चार कोटी घरांची निर्मिती करत गरिबांना हक्काची घरे दिली आहेत. येत्या काही वर्षांत आणखी ३ कोटी घरे बांधण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प वेळेत पूर्ण करू -मुख्यमंत्री

मुंबईत, महाराष्ट्रात आज अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत, तर अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हे सर्व प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळेच शक्य झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आज बोरिवलीवरून ठाण्याला जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. पण ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा पूर्ण झाल्यास केवळ १२ मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे. आज ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले ते निश्चित वेळेत पूर्ण करू, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

उद्दिष्टांच्या दृष्टीने वाटचाल -फडणवीस

राज्य सरकारने २०१८ मध्ये मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून कुठेही केवळ ५९ मिनिटांत पोहोचता यावे यादृष्टीने पायाभूत सुविधा प्रकल्प राबवायचे असे उद्दिष्ट ठेवले आहे. मेट्रो, सागरी मार्ग, सागरी सेतू, बोगदे प्रकल्प म्हणजे या उद्दिष्टांच्या दृष्टीने होणारी वाटचाल असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी हे विकासपुरुष असल्याचे कौतुक करत अजित पवार यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकार जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार असल्याचे म्हटले.

तिप्पट वेगाने विकास

केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मान्यता दिली आहे. ७६ हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे १० लाख रोजगाराची निर्मिती होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तिसऱ्यांदा आमचे सरकार जेव्हा केंद्रात आले तेव्हा आम्ही आता तिप्पट वेगाने विकास करू असे उद्दिष्ट ठेवले. त्या उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही वेगाने पावले टाकत आहोत, हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट होत आहे.

तिप्पट वेगाने विकास

केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मान्यता दिली आहे. ७६ हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे १० लाख रोजगाराची निर्मिती होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तिसऱ्यांदा आमचे सरकार जेव्हा केंद्रात आले तेव्हा आम्ही आता तिप्पट वेगाने विकास करू असे उद्दिष्ट ठेवले. त्या उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही वेगाने पावले टाकत आहोत, हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट होत आहे.देश वेगाने विकास करत असताना यात महाराष्ट्राचा, मुंबईचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राचा येत्या काही वर्षांत जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून लौकीक निर्माण होईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान