मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन, स्थानकांवरील स्टॉल्सचे उद्घाटन, नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविणे अशा तब्बल ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन किंवा भूमिपूजन मंगळवारी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमातून या सोहळयांना उपस्थित राहणार आहेत.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्री सहभागी होतील. यात ‘वन स्टेशन, वन प्रॉडक्ट’ स्टॉल्सच्या उद्घाटनासह काही प्रकल्पांचे भूमिपूजन आणि नवीन गाडयांना हिरवा झेंडा दाखविण्याचा समावेश आहे.
हेही वाचा >>> रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणेचा अभाव; संवेदनशील ठिकाणी बॅग स्कॅनर यंत्रे, मेटल डिटेक्टर बंदच
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्च रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि १० वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्सचे उद्घाटन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सौरऊर्जा पॅनेल, ऑटोमॅटिक सिग्निलग सिस्टीम, गती शक्ती कार्गो टर्मिनस, गुड्स शेड, लोको शेड/वर्कशॉप्स, नवीन मार्गिका, दुहेरीकरण, गेज कन्व्हर्जन, जनऔषधी केंद्र, रेल्वे कोच रेस्टॉरंट्स आणि वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महाराष्ट्रातील ५०६ प्रकल्पांचे उद्घाटन केले जाईल. यात १५० वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, १३० सौरऊर्जा पॅनेल, १८ नवीन रेल्वे मार्ग / रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण/ गेज रूपांतरण, १२ गुड्स शेड, ७ स्वयंचलित सिग्निलग प्रणाली, ४ गती शक्ती कार्गो टर्मिनल, ३ विद्युतीकरण प्रकल्प याचा समावेश आहे. तसेच लातूर येथील रेल्वे डबा कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो याचे लोकार्पण केले जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे पाच जन औषधी केंद्रांचे उद्घाटन, नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे ४ रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन केले जाईल.
मुंबई पालिकेचीही लगबग
गेल्या आठ दहा दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन लोकार्पण करण्याचा सपाटा सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडयापासून रविवापर्यंत जवळपास दहा विकासकामांचे लोकार्पण झाले आहे. त्यात वरळी कोळीवाडा येथे सी फूड प्लाझा म्हणजेच बचतगटांसाठी कोळी खाद्यपदार्थ विक्री केंद्रे सुरू आहे.तर रविवारी केम्पस कॉर्नर परिसरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृती जागवणाऱ्या भित्तीचित्राचे उद्घाटन पार पडले.