मुंबई : PM Narendra Modi mumbai visit वांद्रे-कुर्ला संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमामुळे गुरुवारी या परिसरातील खासगी कार्यालयांना दुपारी १२ नंतर सुट्टी देण्यात आली होती. परिणामी, वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील कार्यालयांमधील अनेक कर्मचाऱ्यांनी दुपारी १२ नंतर घरची वाट धरली. दरम्यान, वांद्रे – कुर्ला संकुल परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना गुरुवारी घरून काम करण्याची सूचना केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आणि विविध प्रकल्पांचा पायाभरणी, लोकार्पण सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वांद्रे – कुर्ला संकुलातील सभास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालय, इतर व्यावसायिक केंद्रे बंद ठेवण्यात येणार असून कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे, अशी अफवा पसरली होती. मुंबई पोलिसांनी बुधवारी खंडन केले. तसेच या परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मात्र गुरुवारी दुपारी १२ नंतर वांद्रे – कुर्ला संकुलातील अनेक खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आले. तर काही कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सकाळी लवकरच बोलावण्यात आले होते. काही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरूनच कार्यालयीन काम करण्याची सूचना करण्यात आली होती. अनेक कंपन्यांच्या कार्यालयांतील कर्मचारी दुपारी १२ च्या सुमारास घरी निघाले. त्यामुळे कुर्ला आणि वांद्रे स्थानकांच्या दिशेने जाणाऱ्या बसगाड्यांना गर्दी दिसत होते. तसेच बस थांब्यावरही प्रवासी बसची प्रतीक्षा करीत होते. तसेच रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती.