पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण सभा गाजवताना, विरोधकांवर शब्दप्रहार करताना आणि ध्यानधारणा करतानाही पाहिले आहे. पण आता ते जंगलात भटकंती करताना, राफ्टिंग करताना दिसणार आहेत. डिस्कव्हरी वाहिनीच्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या जगभर लोकप्रिय कार्यक्रमाच्या विशेष भागात त्यांचे ‘साहस’ पाहता येईल.

ब्रिटिश साहसी खेळपटू बेयर ग्रिल्स याचा सहभाग असलेला आणि भारताच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात चित्रीकरण करण्यात आलेला हा विशेष भाग ‘मुक्त आणि मोकळ्या जंगल प्रवासा’चा असेल. त्यात वन्यजीव संवर्धनावर प्रकाश टाकण्यात येईल, असे या वाहिनीने प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे. या एपिसोडचे प्रथम प्रक्षेपण (प्रीमियर) १२ ऑगस्टला होणार आहे. डिस्कव्हरी वाहिन्यांच्या १८० देशांमधील नेटवर्कवर तो दाखवला जाणार आहे. या कार्यक्रमाचा टीजर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची आजपर्यंत सर्वाना अपरिचित असलेली बाजू १८० देशांतील लोकांना पाहता येईल. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी जंगलसाहस केले आहे’’ असे ट्विट बेयर ग्रिल्स याने केले आहे. पंतप्रधान मोदी जंगलात भटकंती करताना, राफ्टिंग हा साहसी खेळ करताना दिसतील. ‘‘तुम्ही भारतातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात. तुमच्या जीविताची काळजी घेणे, हे माझे काम आहे’’, असे ग्रिल्स पंतप्रधानांना या कार्यक्रमात सांगत असल्याचा ‘टीजर’ वाहिनीने प्रसिद्ध केला आहे.

या अनुभवाविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मी कित्येक वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात, पर्वत आणि जंगलांच्या सोबतीने राहिलो आहे. त्या काळाचा माझ्या आयुष्यावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे. त्यामुळे राजकारणापलीकडील जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या आणि निसर्गाच्या सान्निध्यातील कार्यक्रमात सहभाग घेण्याबाबत मला विचारणा झाली; तेव्हा माझी जिज्ञासा जागी झाली.’’

भारताचा समृद्ध असा पर्यावरणीय वारसा जगासमोर मांडण्याची, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याची आणि निसर्गाच्या संगतीत राहण्याची मोठी संधी या कार्यक्रमाने दिली. बेयर याच्यासोबत जंगलात पुन्हा एकदा काही काळ घालवणे हा अद्भुत अनुभव होता.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधानांना वन्यप्रदेशात साहसासाठी नेणे हा माझा गौरव होता. या असामान्य जागतिक नेत्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्यामुळे माझा सन्मान झाला आहे. या महान देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला समजून घेता आल्यामुळे मी कृतार्थ झालो आहे.

– बेयर ग्रिल्स, साहसपटू

Story img Loader