मुंबईः पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटीव्ह (पीएमसी) बँक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८०७ एकर जमिनीवर टाच आणली. त्याची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. गैरव्यवहारातील ८२ कोटी ३० लाख रुपयांद्वारे २०१० ते २०१३ या कालावधीत या जमिनी ३९ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्या होत्या.
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग गावात ही मालमत्ता आहे. रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकाने पीएमसी बँकेत गैरव्यवहाराची झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. याप्रकरणी पीएमसी बॅंकेचा तत्कालीन व्यस्थापकीय संचालक जॉय थॉमस याच्या जबाबाच्या आधारावर कर्ज देण्यात काही अनियमितता असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने ६११७ कोटी ९३ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली जॉय थॉमस, राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
हेही वाचा : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’चे प्रदर्शन एक दिवस पुढे ढकलले, दोन्ही चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार
तपासात २०१० ते २०१३ या कालावधीत एचडीआयएलचे प्रवर्तक सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांनी या गैरव्यवहातून मिळालेल्या रकमेतील ८२ कोटी ३० लाख रुपये विजयदुर्ग येथील ३९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते. त्यासाठी मेसर्स प्रिव्हिलेज पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मेसर्स प्रिव्हिलेज हाय-टेक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या उप कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सारंग वाधवान यांनी आपले कर्मचारी मुकेश खडपे याच्याशी संगनमत करून कमिशन व इतर लाभांच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनी एचडीआयएल समूहाच्या कंपनीच्या नावे हस्तांतरित केल्या होत्या. त्यासाठी रोख रकमेचाही वापर करण्यात आला. या कंपनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये होती. एचडीआयएल ग्रुप कंपनीच्या नावाने पॉवर ऑफ ॲटर्नी बनवण्यात आली. बंदरांच्या विकासासाठी या जमिनी कथितपणे संपादित करण्यात आल्या होत्या. पण त्याचा विकास होऊ शकला नाही.
हेही वाचा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
याप्रकरणी १७ ऑक्टोबर,२०१९ रोजी मुख्य आरोपी राकेश कुमार वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणी यापूर्वी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आतापर्यंत ७१९ कोटी ११ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे.