मुंबई : पंजाब अॅण्ड नॅशनल (पीएनबी) बॅंक घोटाळा प्रकरणातील फरारी हिऱे व्यापारी मेहुल चोक्सी याला कर्करोग झाला असून सध्या तो बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याचे त्याच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला सांगितले. चोक्सी याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित मुंबईतील विशेष न्यायालयाकडे केली आहे.

ईडीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी, चोक्सी सध्या बेल्जियममध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. तसेच, चोक्सी याला भेडसावत असलेल्या अन्य आरोग्यविषयक समस्यांची माहिती देण्यासाठी अर्ज करण्याची परवानगीही त्याच्या वकिलाने न्यायालयाकडे केली. आर्थिक घोटाळ्यातील एखाद्या आरोपीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्याची परवानगी तपास यंत्रणेला मिळते.

पंजाब नॅशनल बँकेला १३,४०० कोटी रुपये बुडवून चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबीयांसह देश सोडून पळून गेले होते. या प्रकरणी दोघांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंदवला होता. तसेच, चौकशीसाठी वारंवार समन्स बजावूनही चोक्सी भारतात येऊन न्यायालय आणि तपासयंत्रणेपुढे उपस्थित झाला नाही. ल्यामुळे ईडीने त्याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती. ईडीचा त्याबाबतचा अर्ज २०१८ पासून प्रलंबित आहे.

Story img Loader