आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर आणि चित्रपटाशी संबंधितांना अटकेपासून दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) स्थापन विशेष न्यायालयाने या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी मांजरेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश माहीम पोलिसांना दिले होते. त्यानंतर माहीम पोलिसांनी मांजरेकरांविरोधात पोक्सो आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याच्या व अटकेपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी मांजरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर मांजरेकर यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली. याचिका ऐकल्यानंतर न्यायालयाने मांजरेकरांच्या संबंधित खंडपीठाकडे याचिका करण्याची सूचना केली. त्याची तयारी दाखवत तोपर्यंत आपल्याला अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी मांजरेकरांच्या वतीने अ‍ॅड् शिरीष गुप्ते यांनी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने ती अमान्य केली.

मांजरेकरांचा दावा मुलांवर अन्याय झालेला नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नाही. त्यामुळे याकडे कला म्हणून पहावे. चित्रपटाच्या झलकीमध्ये दाखवलेली दृश्ये कधीही चित्रपटाचा भाग नव्हती आणि युटय़ूबवरून ती काढून टाकण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही बॅँडिट क्वीन चित्रपटातील दृश्यांना परवानगी देताना अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत जागरूकतेसाठी अशी दृश्ये दाखवणे गरजेचे असल्याचे म्हटले होते, असा दावाही मांजरेकर यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pocso under the prevention of sexual harassment act high court producer mahesh manjrekar akp