* भावी डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा रुग्णांना फटका
* ध्वनिप्रदूषणाचे नियम धुडकावून तब्बल दोन तास मिरवणूक

* वरळीच्या पोदार रुग्णालयातील प्रकार
रुग्णालयापासून १०० मीटरचा परिसर हा ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित केलेला असतानाही वरळीच्या ‘आर. ए. पोदार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालया’त ध्वनिप्रदूषणविषयक सर्व नियम धाब्यावर बसवून गुरुवारी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली. येथील विद्यार्थ्यांनी काढलेल्या या मिरवणुकीत यथेच्च वाजविण्यात आलेले फटाके आणि ढोलताशांचा कर्णकर्कश आवाज तब्बल दोन तास रुग्णालय परिसराची शांतता बिघडवीत होता. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार रुग्णालयाच्या ओपीडी आणि आयपीडीपासून सुमारे २० ते ३० फुटांच्या अंतरावर सुरू होता. त्यामुळे येथील रुग्णांना तब्बल दोन तास हा कानठळ्या बसविणारा दणदणाट सहन करावा लागला.
पोदारच्या आवारातच रुग्णालय आणि महाविद्यालय आहे. येथील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास गणपतीच्या आगमनासाठी येथील विद्यार्थ्यांनी रुग्णालयाचे प्रवेशद्वार ते वसतिगृह अशी मिरवणूक काढली. साधारणपणे १०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. परंतु, गणपतीची मिरवणूक वसतिगृहापर्यंत येण्यास तब्बल दोन तास लागले. गुलालाच्या उधळणीत आणि ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत काही विद्यार्थी बेधुंद होऊन नाचत होते, अशी तक्रार रुग्णाच्या एका नातेवाईकाने केली. याशिवाय मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणावर फटाकेही वाजविण्यात आले. त्यामुळे, रुग्णालयाचा परिसर तब्बल दोन तास दणाणून गेला होता.
महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाच्या ओपीडी आणि आयपीडीपासून केवळ २० ते ३० फुटांच्या अंतरावर हा सर्व प्रकार सुरू होता. ध्वनिप्रदूषणविषयक नियमांनुसार रुग्णालयापासून १०० मीटरचा परिसर हा शांतता क्षेत्र समजला जातो. या परिसरात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबलच्या पुढे आवाजाची पातळी नसावी. परंतु, ढोलताशे आणि फटाके वाजवून हा नियम पायदळी तुडविण्यात आला. ध्वनीविषयक नियम धुडकावणाऱ्या राजकीय नेत्यांना, मंडळांना न्यायालयाचे फटकारे बसत असताना एका सरकारी रुग्णालयातच हा प्रकार घडावा, याइतके दुर्दैव नाही.
रुग्णालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांना अशी मिरवणूक काढायला मुळात परवानगीच कशी दिली जाते, असा सवाल रुग्णाच्या एका नातेवाईकाने केला. तर भावी डॉक्टरच असे बेजबाबदारपणे आणि नियम धुडकावून वागत असतील तर सामान्यांचे काय असा प्रश्न आणखी एका नातेवाईकाने केला. या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता जी. वाय. खटी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ते रजेवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.