मुंबई : मुंबईचे कवी आणि कलासमीक्षक रणजित होस्कोटे यांनी इस्रायली राज्ययंत्रणा आणि यहुदी (ज्यू) समाज तसेच ‘हमास’ आणि पॅलेस्टिनी लोक यांच्याबद्दल मर्मग्राही मुद्दे मांडून १३ नोव्हेंबर रोजी जर्मनीतील अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘डॉक्युमेण्टा’ या महाप्रदर्शनाच्या निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. याचे वादळी पडसाद उमटले असून, गुरुवारी १६ नोव्हेंबर रोजी समितीतील पाचही जणांनी राजीनामे दिल्यामुळे हे महाप्रदर्शन भरवण्याची प्रक्रियाच लांबणार, हेही उघड झाले आहे.
भारतीय कवीचे तत्त्वभान जगाला कसे मार्गदर्शक ठरते, याचे उदाहरण म्हणूनही या घटनेकडे पाहिले जाते आहे. जर्मनीतील एक अतिउत्साही ज्यू-धार्जिण्या राजकारणी आणि त्या देशाच्या सांस्कृतिक मंत्री क्लॉडिया रॉथ यांनी होस्कोटेंवर ज्यूविरोधाचा आक्षेप ९ नोव्हेंबर रोजी जाहीरपणे घेतला, तो अनाठायी असल्याचेच इतरांच्या राजीनाम्यांमधून सिद्ध होते आहे. ‘बीडीएस’ या ज्यूविरोधी संघटनेच्या भारतातल्या समर्थकांनी २०१९ मध्ये काढलेल्या एका पत्रकावर अन्य अनेकानेक लेखक/ कलावंतांप्रमाणेच होस्कोटे यांचीही स्वाक्षरी होती. हे खुसपट काढून रॉथ यांनी जर्मनीच्या दक्षिण भागातून प्रकाशित होणाऱ्या ‘सूदडॉएच्च झायटुंग’ या वृत्तपत्राशी बोलताना ‘हा सरळसरळ ज्यूद्वेष आहे..’ असा आक्षेप घेतला. ‘या असल्या लोकांना आपण ‘डॉक्युमेण्टा’सारख्या जागतिक ख्यातीच्या आणि जर्मनीची मान उंचावणाऱ्या महाप्रदर्शनाच्या निवड समितीवर बसवतोय.. हे प्रकार थांबले नाहीत, तर ‘डॉक्युमेण्टा’ला मिळणारा सरकारी निधी थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल’ अशा आशयाचा तणतणाट रॉथ यांनी केला होता.
हेही वाचा >>> कार्यालयीन वेळा बदलण्याचे ३५० संस्थांना साकडे; मुंबईतील सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांना मध्य रेल्वेचे पत्र
‘डॉक्युमेण्टा’मधील कलाकृती निवडणाऱ्या प्रमुख गुंफणकाराची (चीफ क्युरेटर अथवा डायरेक्टर) निवड ही समिती करत असल्याने तिच्या कामावर आपला वचक हवा, असा राजकीय आटापिटा यातून दिसला होता! यानंतर तीनच दिवसांनी होस्कोटे यांनी राजीनामा दिला. ‘बीडीएस’ या संघटनेचा ज्यूद्वेष अनेकांना न पटणारा असू शकतो हे मान्यच, परंतु आजघडीला इतके विखारी वातावरण असताना, इस्रायली राज्ययंत्रणा म्हणजेच ज्यू लोक असे सरसकटीकरण आपण करू नये, कारण याच न्यायाने मग सर्व पॅलेस्टिनींवर हमास-समर्थक असल्याचा शिक्का मारण्याचे प्रकार घडू शकतात, असा उल्लेख होस्कोटे यांनी राजीनामा-पत्रात केला आहे. त्यांच्यानंतर लगोलग निवड समितीतले पद सोडले ते तेल अवीव (इस्रायल) येथे राहणारे हिब्रू-इंग्रजी कवी आणि तत्त्वचिंतक ब्राचा एल. एटिन्जर यांनी! यामुळे होस्कोटेंचा ‘इस्रायली राज्ययंत्रणा आणि ज्यू लोक यांत फरक’ हा मुद्दा थेटच सिद्ध झाला आणि जर्मन राजकारण्यांच्या अतिरेकी ज्यूप्रेमाचीही लक्तरे निघाली, पण खरा दणका बसला तो गुरुवारी. स्वित्झर्लंडवासी आफ्रिकन कलासमीक्षक सायमन एन्जामी, शांघायच्या चित्रकार व कलाविषयक अभ्यासक गाँग यान, बर्लिनच्या कलाभ्यासक, गुंफणकार कॅथरीन ऱ्हॉम्बर्ग तसेच दक्षिण अमेरिकेतील एका कला संग्रहालयाच्या अधिकारी मारिया इनेस रॉड्रिगेझ या उरल्यासुरल्या चौघा सदस्यांनीही राजीनामे दिले असून शुक्रवारी हे वृत्त सर्वदूर पोहोचले. यामुळे आता पुन्हा नव्याने निवड समिती नेमून ‘डॉक्युमेण्टा’च्या प्रमुख गुंफणकाराची निवड-प्रक्रिया सुरू करावी लागणार, अशी मोठीच नामुष्की कासेल शहरातील या पंचवार्षिक महाप्रदर्शनापुढे उभी राहिली आहे.