मुंबई : ‘आत्रेय’तर्फे दिला जाणारा ‘शिरीष पै पुरस्कार’ यंदा कवयित्री आणि कथाकार नीरजा यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा ४ डिसेंबरला होईल.
१९८८ मध्ये विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ६०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीरजा यांनी नवोदितांच्या व्यासपीठावर ‘सावित्री’ या कवितेचे वाचन केले होते. तेव्हापासून त्या प्रकाशझोतात आल्या.
‘वेणा’ या पहिल्याच कवितासंग्रहापासून प्रखर जाणिवेची कविता लिहिणाऱ्या नीरजा ‘निरर्थकाचे पक्षी’ या चौथ्या कवितासंग्रहात समकालीन प्रश्नांना भिडलेल्या दिसतात. त्यांच्या कवितेतील विद्रोह हा केवळ पुरुषप्रधानतेविरोधात नाही, तर एकूणच परंपरावादी विचारसरणीच्या विरोधातला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह आणि रोख २१ हजार रुपये असे आहे. यापूर्वी कवयित्री प्रभा गणोरकर, समाजसेविका विद्या बाळ, कथाकार आशा बगे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.