माझी आई कविता करायची. आईचे वडील म्हणजे माझे आजोबा आणि पणजोबाही कविता लिहायचे. त्यामुळे ताल, छंद रक्तातच होते. मला वेगवेगळ्या विषयावर आतून कविता जाणवते, असे सांगत पद्मभूषण कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी शुक्रवारी आपला कवितेचा प्रवास उलगडून दाखवला.
निमित्त होते दादर-माटुंगा कल्चरल सेंटरने हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या काव्यरंग महोत्सवाचे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन पाडगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांनी पाडगावकर यांच्याशी संवाद साधला.
वेगवेगळ्या विषयांवर कवितेचा शोध घ्यायला पाहिजे, असे मला वाटले आणि मी लिहायला लागलो. सुरुवातीच्या काळातील माझ्या कविता निसर्ग, प्रेम, भावभक्ती आदी विषयांवरील होत्या. मात्र ‘विदूषक’ या कवितासंग्रहापासून माझ्या कवितेने वेगळे वळण घेतले, असे पाडगावकर यांनी सांगितले.
विल्सन हायस्कूलमध्ये असताना प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखा शिक्षक मला लाभला हे माझे भाग्य असल्याचे सांगून पाडगावकर म्हणाले की, आचार्य अत्रे यांच्या ‘समीक्षक’ या मासिकात माझी पहिली कविता छापून आली. त्यानंतर अत्रे यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी ‘कविता लिहिणे सोडू नकोस्, मराठीतील उद्याचा तू मोठा कवी होणार आहेस’ अशा शब्दांत दिलेली शाबासकी, कवीवर्य बा. भ. बोरकर यांनी ‘या मुलाची चेष्टा करू नका, या मुलाच्या नावाने पुढे मराठीत नाणे पडणार आहे’, असा व्यक्त केलेला आत्मविश्वास आणि माझ्या ‘जिप्सी’ या काव्यसंग्रहावर वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी ‘आता मी कविता लिहिणे थांबवले तरी चालेल’ अशा शब्दांत माझे कौतुक केले होते. दिग्गजांचा मला मिळालेला आशिर्वाद माझ्यासाठी मोलाचा ठरला.
नाटककार मामा वरेरकर, धर्माने ख्रिश्चन असलेल्या यशोधराबरोबर झालेला प्रेमविवाह, आचार्य अत्रे यांच्यासमवेत झालेली पहिली भेट, शाळेतील आठवणी व किस्से यांच्याही आठवणींना पाडगावकर यांनी उजाळा दिला.
रंगलेल्या या अनौपचारिक गप्पांचा समारोप पाडगावकर यांनी ‘यांचं असं का होतं कळत नाही’, ‘प्रेम म्हणजे, प्रेम असतं’ आणि ‘चिऊताई दार उघड’ या कविता सादरीकरणाने केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा