मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ येथे प्रवाशांना भावनिक आधार देण्यासाठी ९ प्रशिक्षित श्वानांचा समावेश असलेला ‘पॉफेक्ट’ उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. करोना काळात हा उपक्रम तात्पुरता बंद करण्यात आला होता.
‘पॉफेक्ट’ हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा विमानतळ प्रशासनाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांचा ताण दूर करणे हा आहे. या ९ प्रशिक्षित श्वानांमध्ये एक गोल्डन रिट्रायव्हर, एक माल्टीज, एक शिह त्झू, एक ल्हासा अप्सो, एक लॅब्रेडोर आणि हस्की यांचा समावेश असणार आहे. हे श्वान टर्मिनल २ येथे शुक्रवार ते रविवार दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, विमानप्रवास काही प्रवाशांसाठी कंटाळवाणा आणि तणावपूर्ण असू शकतो हे ओळखून हा उपक्रम सुरू केल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.
हेही वाचा…पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
या उपक्रमाचा भाग असलेला गोल्डन रिट्रायव्हर हा स्कॉटिश प्रजातीतील आहे. सौम्य आणि प्रेमळ स्वभावासाठी तो ओळखला जातो. याचबरोबर ल्हासा अप्सो हा तिबेटियन असून ही दीर्घकाळ जगणारी प्रजाती आहे. त्यांचे कान लांब केसांनी झाकलेले असतात. त्यांची केसाळ शेपटी विविध रंगाची असते. तसेच सायबेरियन हस्की इतर प्रजातींच्या तुलनेत जाड असतो. सायबेरियन हस्कीचा रंग प्रामुख्याने करडा, फिकट निळा असतो. यामुळे त्यांच्या आकर्षणात आणखी भर पडते. त्यांचा स्वभाव मैत्रीपूर्ण आणि सौम्य आहे. उपक्रमाची घोषणा करताच समाज माध्यमावर कौतुक करण्यात आले.
हेही वाचा…अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
प्रवाशांना प्रवासास सुरुवात करण्यापूर्वी काही काळ विमानतळावर घालवावा लागतो. अशा वेळी प्रवाशांचे थोडे मनोरंजन व्हावे, त्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, तसेच त्यांचा पुढील प्रवास आनंदमयी व्हावा यासाठी पॉफेक्ट हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.