मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे कोर्णाक एक्स्प्रेसला इंजिन जोडताना पॉइंटमन सूरज सेठ याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर सूरज रेल्वेत रुजू झाला होता.

मंगळवारी दुपारी ३.१० च्या सुमारास सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १६ वर कोर्णाक एक्स्प्रेसचे डबे आणि इंजिन जोडण्याचे काम सूरज करत होता. पहिल्या प्रयत्नात इंजिन आणि डब्याची जोडणी न झाल्याने, पुन्हा जोडणीचे काम करत असताना इंजिनची जोरदार धडक त्याला बसली.

हेही वाचा >>>तीन मेट्रो मार्गांसाठी कारशेडची प्रतीक्षा कायम, ठाण्यातील मोघरपाड्यातील जागेचा अजूनही ताबा नाही

कोर्णाक एक्स्प्रेसच्या डब्यांची जोडणी करताना सूरज एकटाच काम करत होता. यावेळी इंजिनला पुढे येण्याचा इशारा देणारा शंटिंग पर्यवेक्षक किंवा अन्य रेल्वे कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. परिणामी, इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले.

Story img Loader