मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर रुग्णालयाच्या आवारात असलेल्या चार कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.
कूपर रुग्णालयाच्या आवारात मोकळ्या जागेत हे भटके कुत्रे रहायचे. मागील तीन दिवसांपासून भटक्या कुत्र्यांना विषारी पदार्थ खायला देऊन मारण्यात येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. रुग्णालयात मंगळवारपर्यंत चार भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या आईला उपचारांसाठी कूपर रुग्णालयात मागील काही दिवसांपासून दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयात दरदिवशी ये जा असते. त्यावेळी हा प्रकार संबंधितांच्या लक्षात आला.
हेही वाचा – मुंबई : किरकोळ वादातून बांबूने मारहाण करून खून, एक जखम
याप्रकरणी सध्या समाज माध्यमांवर रुग्णालयातील मृत कुत्र्यांचे फोटो प्रसारित होत आहेत. दरम्यान, याबाबत कूपर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णालयात असे प्रकार घडत असून त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी कांदिवली येथील एका नाल्यात पाच भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून फेकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अंधेरी येथील एका गृहनिर्माण सोसायटीत भटका कुत्रा भुंकत असल्यामुळे त्याच्या रागातून त्याला एअरगनची गोळी मारण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर प्राणीविषयक कायदे कडक करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली होती.
हेही वाचा – मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीकारांचे मंडप जागोजागी, बंदी फक्त कागदावरच
घटना समजताच आम्ही पोलिस तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन आरोपीवर योग्य ती कारवाई केली जावी अशी विनंतीही रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. – डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय