सोसायटीच्या सीसीटीव्हीतील चित्रण नष्ट केल्याचा संशय
‘भूतदया हीच मानवता’ अशा सुविचारांना हरताळ फासणारी घटना शुक्रवारी कांदिवली येथील पोईसर येथे घडली. पोईसर येथील महावीरनगरातील एका सोसायटीच्या आवारात असलेल्या कुत्र्याच्या नऊ पिलांपैकी सहा पिलांना विष देऊन मारण्यात आले. त्यापैकी एका पिलाला अर्धवट जाळण्यातही आले होते. शेवटी श्री रामानुग्रह ट्रस्ट आणि मुहरी पाश्र्वनाथ जीवदया ट्रस्ट या दोन प्राणिमित्र संघटनांनी हे प्रकरण हाती घेत कांदिवली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली. विशेष म्हणजे ज्या सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला, त्या सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील त्या दिवसांचे चित्रीकरण नष्ट केले गेले आहे.
कांदिवली पश्चिमेला पोईसर भागातील शंकर गल्ली येथे सी-३ आणि कमल अपार्टमेण्ट या दोन सोसायटय़ांमधील मोकळ्या जागेत तीन महिन्यांपूर्वी कुत्र्याची नऊ पिल्ले आसऱ्याला आली होती. त्यापैकी सहा पिलांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी भीषण अवस्थेत सी-३ सोसायटीतील लहान मुलांना आढळले. त्यांनी हा प्रकार सोसायटीत राहणाऱ्या आणि मुहरी पाश्र्वनाथ जीवदया ट्रस्ट या संस्थेसह काम करणाऱ्या ऋषभ बोरा या तरुणाला सांगितला.
या सहापैकी एका कुत्र्याचे चारही पाय बांधले होते आणि त्याचा एक डोळा फोडण्यात आला होता. एका कुत्र्याचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. दोन कुत्र्यांचे मृतदेह इतस्तत: पडले होते, तर दोघांना छोटय़ाशा खड्डय़ात कोंबून ठेवले होते. हा प्रकार बघून आपण तातडीने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्याची माहिती ऋषभने ‘लोकसत्ता’ला दिली.
ऋषभसह श्री रामानुग्रह ट्रस्ट या प्राणिमित्र संस्थेचा ओंकार राणे हादेखील या घटनेचा पाठपुरावा करीत आहे. या सहाही पिलांना विष देऊन मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यांचा मृत्यू होऊन २४ तास उलटून गेल्यामुळे त्यांचे शवविच्छेदन होऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे ज्या सोसायटीच्या आवारात हा प्रकार घडला, तेथील नेमक्या त्या दोन दिवसांचे चित्रीकरण झालेच नसल्याचा दावा सोसायटीतील सदस्य करीत असल्याचेही ओंकारने स्पष्ट केले. कांदिवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.