मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी कार्यालया बाहेर भोंगे लावले. यानंतर मुंबई पोलिसांनी या नेत्यावर कारवाई करत भोंगे उतरवले आहे. पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्याला समज देऊन भोंगे काढले. तसेच ताब्यात घेऊन चिरागनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
शनिवारी (२ एप्रिल) राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला. यानंतर मनसैनिकांकडून भोंगे लावण्याचे प्रकार घडले. घाटकोपरमध्ये देखील मनसेचे चांदिवली विभागातील महेंद्र भानुशाली यांनी मनसे कार्यालयाबाहेर झाडावर भोंगे लावले. यावर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी अगोदर समज दिली आणि मग भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती आहे.
कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा.”
हेही वाचा : नकलाकार, सुपारीबाज राज ठाकरे भाजपाची टीम सी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
“अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, तिथेही प्रार्थना केल्या जातात, पण जाहीरपणे भोंगे बसवल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का, कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगितलं गेलंय. यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.