Team India T20 World Cup 2024 Victory Parade Updates, 4 July 2024 : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर गुरुवारी, ४ जुलै रोजी मरिन ड्राईव्ह येथे शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मुंबई पोलिसही सज्ज झाले आहेत. वानखेडे स्टेडियम आणि शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतुकीतही अनेक बदल करण्यात आले आहेत.

शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन. एस. मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वीर नरिमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय. ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : गोखले पुलावर गोमातांचा वावर, वाहतूक कोंडीत भर; महापालिका हतबल

हेही वाचा – PM Narendra Modi Meet Team India Live: रोहित शर्मा, जय शाह आणि संपूर्ण भारतीय संघ मोदींच्या भेटीला रवाना

नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत. मुंबई किनारी मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दल व अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सायंकाळी ५ नंतर आयोजित शोभायात्रेसाठी पोलीस वानखेडे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे. त्यासाठी पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.