दहावीच्या परीक्षेला गालबोट लावणाऱ्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसाचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कांदिवली पोलिसांकडून होत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्याची मागणी मंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली आहे.
कांदिवली येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्यांकडे कॉपी करताना बीजगणिताचे दोन पेपरसंच सापडले होते. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या मुलाचाच यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांच्या तपासाचा वेग मंदावला. एवढेच नव्हे तर या संदर्भात मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीनेही पोलिसांनी तपास करताना कॉपी कुणी लिहून दिली त्याचे अक्षर पडताळून पाहावे, विद्यार्थ्यांचे तसेच इतर संशयितांचे मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासावे, विद्यार्थ्यांने सर्वप्रथम केलेल्या ‘मला माझ्या वडिलांनीच प्रश्नपत्रिका दिली’ या जबाबाच्या आधारेच तपास करावा, अशा शिफारसी केल्या होत्या. मात्र त्यानंतरही स्थानिक पोलिसांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने पोलीसच हे प्रकरण दाबत असल्याचा संशय मंडळाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन अन्य अधिकाऱ्याकडे द्यावे, असे पत्र देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.