मुंबई : तिसरे अपत्य नको म्हणून चार महिन्यांच्या मुलीचा पाळण्यातच गळा आवळून ठार मारणाऱ्या ४० वर्षीय पित्याला शनिवारी पंतनगर पोलिसांनी अटक केली. घाटकोपर पूर्व येथे ही घडना घडली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. संजय बाबू कोकरे (४०) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो घाटकोपर पूर्व येथे कामराज नगर परिसरातील भैरव नगर विद्यालयाच्या समोरील गल्ली क्रमांक १० येथे कुटुंबियांसोबत राहात होता. संजयची पत्नी शैला कोकरे (३६) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी संजयला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकरे दाम्पत्याला दोन मुले आहेत.

चार महिन्यांपूर्वी शैला यांनी मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव श्रेया ठेवण्यात आले होते. पण संजयला तिसरे अपत्य नको होते. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद झाले होते. शैलाने शुक्रवारी रात्री श्रेयाला पाळण्यात झोपवले. शैलाने सकाळी पाहिले असता श्रेया हालचाल करत नव्हती. अखेर तिला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत श्रेयाचा गळा आवळून तिला मारण्यात आल्याचे समजले. अखेर याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी शैला यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

चौकशीत आरोपी संजय कोकरे याची चौकशी केली असता त्यानेच मुलीला मारल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याला याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अटक केली. आरोपी संजयला तिसरे अपत्य नको होते, त्यामुळे चार महिन्याची चिमुकली श्रेयाचा गळा आवळून तिला मारल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी संजयला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader