मुंबई : सराईत गुन्हेगारी टोळीच्या नावाने एका ठेकेदाराकडे तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. आलम खान (४८) असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विक्रोळी परिसरात वास्तव्याला असलेले नूरआलम खान (४४) यांचा याच परिसरात ठेकेदाराचा व्यवसाय आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला होता. आपण छोटा राजन टोळीचा गुंड असल्याचे सांगत त्याने त्यांच्याकडे प्रथम तीन कोटी रुपये खंडणीची मागणी केली. मात्र तक्रारदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर अनेकदा या आरोपीने विविध गुन्हेगारी टोळींच्या नावाने त्यांना फोन करून खंडणीची मागणी केली.
हेही वाचा…संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १४ वर्षांनी सिंहाचा जन्म
तीन दिवसांपूर्वी आरोपीने पुन्हा एकदा फोन करून एक कोटी रुपयांची मागणी केली. मात्र यावेळी ठेकेदाराने पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मंगळवारी आरोपीला विक्रोळी परिसरातून अटक केली. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.