मुंबई : रस्त्यावरून जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांना चाकूच्या धाकावर लूटणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये माटुंगा व ॲन्टॉप हिल पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्याच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरबा मिठागर येथे राहणाऱ्या व भाजी विक्री करणाऱ्या माला गिरी (५०) या शनिवारी पाच उद्यान येथील पारशी अग्यारी परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. हीच संधी साधून काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले. त्यांनी गिरी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २५ हजार रुपये काढून घेतले. भाजी विक्री करणारे सोमनाथ लोंढे (४३) यांच्यासोबतही असाच प्रकार घडला.
हेही वाचा…डॉक्टरच्या मदतीने बाळाची विक्री? ८ महिलांसह ९ जणांना अटक
लोंढे पाच उद्यान येथील लेडी जमशेदजी मार्गावरून जात असताना त्यांना त्याच अज्ञात आरोपींनी रस्त्यात अडवले आणि चाकूचा धाक दाखवून लोंढे यांच्याकडील पाच हजार रुपये काढून पोबारा केला. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर उपायुक्त रागसुधा आर. यांनी परिमंडळातील गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्यांना आरोपींना तत्काळ पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ॲन्टॉप हिल पोलिल ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने व त्यांच्या पथकाने खबऱ्यांना कामाला लावले. तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या मदतीने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अरबाज शेख उर्फ बाबुलाल (१८) याला मदने व पथकाने पकडले. तसेच अरबाजच्या अन्य साथीदारांची माहिती माटुंगा पोलिसांना देण्यात आली. माटुंग्याचे उपनिरीक्षक संतोष माळी व पथकाने तपास करून अन्य दोन आरोपी रफिक सिद्दीकी (२०) आणि फैजान जमादार (२२) यांना पकडले. हे तिघे सराईत गुन्हेगार असून निर्जनस्थळी पादचाऱ्यांना गाठून त्यांना चाकूचा धाक दाखवून लूटत होते.