भावाला जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका 56 वर्षीय माणसाची हत्या करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अजीम आमीर शाद खान, जाहीर अमीर शाद खान, मोइनुद्दीन शेख, जितेंद्र जीवन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणातला आमीर शाद हा आरोपी फरार असून त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.
आमीर शाद यांचा 40 वर्षीय भाऊ 40 दिवसांपूर्वी वारला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजले होते. मात्र आमीर शादला संशय होता की अब्दुल्ला खान या 56 वर्षाच्या माणसाने त्याला जादू टोणा करुन ठार केले. याच रागातून 21 डिसेंबरला अब्दुल्ला खानवर हजीम आणि जाहीद या दोघांनी धारदार शस्त्राने वार केला. यानंतर हे दोघेही तिथून पळून गेले. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस या मारेकऱ्यांचा शोध घेत होते.
परिमंडळ-८ चे उपयुक्त अनिल कुंभारे यांच्या पोलीस पथकातील अधिकारी यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अब्दुल्ला खानच्या हत्येत फरारी असलेले आरोपी हे टॅक्सीने फिरत असल्याची माहिती समोर आली. उपायुक्त कुंभारे यांच्या पथकाने वाकोला जंक्शन येथे सापळा रचला आणि या टॅक्सीवर पाळत ठेवली. संशयास्पद टॅक्सी जेव्हा दिसली तेव्हा पोलिसांनी थांबवून चौकशी केली. या टॅक्सीत चौघे होते ज्यांना या खुनाप्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांपैकी जितेंद्र जाधव हा झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्यानेच हत्येसाठी लागणारी धारदार शस्त्रे पुरवली होती अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आता फरार अमीर शादचा शोध घेत आहेत. आमीर शाद हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा नातलग असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.