मुंबई : पत्नीला विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे विमानात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी करणाऱ्याला बंगळुरू येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई-बंगळुरू विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. पत्नी विमानतळावर पोहोचेपर्यंत विमान थांबवण्यासाठी आपण हा प्रकार केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले.
विमान कंपनीच्या मालाड येथील कॉल सेंटरला २४ फेब्रुवारीला एक दूरध्वनी आला होता. त्या अनोळखी व्यक्तीने मुंबईहून बंगलोरला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. विमानात १६७ प्रवासी होते आणि ते विमान येथे उड्डाणासाठी सज्ज होते. त्यावेळी बॉम्ब असल्याच्या धमकीच्या दूरध्वनी करून विमानतळ पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक व नाशक पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती.
हेही वाचा…१२४ गावांचा विकास एमएमआरडीएच्या हाती; ‘नवनगरा’साठी शासन निर्णय प्रसिद्ध, हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत
सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवून नंतर संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची बॉम्बशोधक पथकाने श्वान पथकासोबत तपासणी केली होती. मात्र विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर रात्री दीड वाजता विमान बंगळुरूला रवाना झाले. या घटनेनंतर निलेश घोंगडे यांनी एअरपोर्ट पोलीस ठाण्यात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीबाबत तक्रार केली. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी भादंवि कलम ५०५ (१), (ब), ५०६ (२), ५०७ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप व पोलीस निरीक्षक मनोज माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील दळवी यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी तपास केला असता तो मोबाईल क्रमांक विलास बाकडे या बंगळुरू येथील रहिवाशाचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दूरध्वनी केल्याचे सांगितले.
हेही वाचा…महायुतीतील तिढा सुटणार? अमित शहा यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर रात्री उशिरापर्यंत खलबते
तपासात त्याची पत्नी कामानिमित्त मुंबईत आली होती. काम संपल्यानंतर ती पुन्हा बंगलोरला जाण्यासाठी निघाली होती. पण तिला विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर होत असल्यामुळे विमान थांबवण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले.