लग्नाचे आमिष दाखवून आठ महिलांना लाखो रुपये व दागिन्यांना गंडा घालणाऱ्या संतोष वाळुंज याला कामोठे पोलिसांनी पनवेल तालुक्यातील नेरे गावातून अटक केली. त्याने यापूर्वी एका महिलेला फसविल्याप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खाल्ली आहे. आठपेक्षा जास्त महिलांना त्याने फसविले असल्याचा संशय पोलिसांचा असून त्याने फसविलेल्या महिलांनी तकार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
पदवीपर्यंत शिकलेल्या संतोषने १५ वर्षांपूर्वी नवी मुंबईत इस्टेट एजन्ट म्हणून बस्तान बसविले. हा व्यवसाय करताना तो परिसरातील परित्यक्ता व विधवा महिलांची माहिती जमा करीत होता. त्यानंतर त्याने अशा महिलांना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढले. आर्थिक चणचणीचे कारण सांगून त्याने या महिलांकडील दागिने, रोख रक्कम घेण्याचा सपाटा लावला. भाषेवर विशेषत: इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असणारा संतोष या महिलांना आपण कस्टम, नेव्ही, किंवा सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत होता.
दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका महिलेला फसविल्याने त्याच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर पनवेल व नेरुळ पोलीस ठाण्यातही असे गुन्हे दाखल असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. व्ही. मुल्लेरवार यांनी दिली. कामोठे परिसरात ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला २० तोळे सोने व तीन लाख रुपयांना फसविल्याची तक्रार तीन दिवसापूर्वी आल्यानंतर संतोषचे बिंग फुटण्यास सुरूवात झाली. त्यानंतर आठ महिलांनी त्याच्याविषयी तक्रार केली. संतोषला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा