मुंबईः हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी एका संशयीताला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यता आली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपी सराईत गुन्हेगार वाटत असून त्याच्या अटकेसाठी २० पथके तयार करण्यात आली आहे. आगीपासून संरक्षण करण्यासाठी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आरोपी आला व सैफचा धाकटा मुलगा जहांगिरच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. घरात शिरलेल्या अनोळखी व्यक्तीला पाहून सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा या सैफचा मुलगा जहांगीरला उचण्यासाठी धावल्या असता आरोपीने त्यांच्यावर हेक्सा ब्लेडसारख्या वस्तूने हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले.
हेही वाचा >>>पुनर्विकासाच्या दिशेने एक पाऊल; पहिल्या टप्प्यात ५०० उपकरप्राप्त इमारतींचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण
त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया लिमा यादेखील मध्ये पडल्या. आरोपीने केलेल्या हल्यात त्याही जखमी झाल्या. ही घटना बुधवारी मध्यरात्री अडीच्या सुमारास घडली. सैफ अली खानला एकूण सहा जखमा झाल्या आहेत. दोन गंभीर स्वरूपाच्या आहेत. प्रामुख्याने त्याच्या पाठीवर, एक मणक्याजवळ असलेली जखम गंभीर आहे. त्याच्या मानेवर एक किरकोळ जखम आहे, तर उर्वरित जखम किरकोळ स्वरूपाची आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची स्थिती स्थिर आहे. हल्यावेळी सैफच्या घरात पत्नी करीना कपूर, दोन मुलगे व तीन महिला कर्मचारी असे सात जण होते. सैफ अली खानचा मुलगा जहांगीरच्या खोलीत शिरलेल्या चोराने महिला कर्मचाऱ्याला शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा सैफच्या लहान मुलाला घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला.
याप्रकरणी सीसी टीव्हीतून आरोपीची ओळख पटली असून तो सराईत असल्याचे वाटत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हेशाखाही समांतर तपास करत आहे. वांद्रे येथे आरोपीशी साधर्म्य असलेला संशयीत दिसला असून त्याच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. याप्रकरणी एका संशयीताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.