मुंबई : घरात कोणीच नसल्याची संधी साधून घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील एका सराईत आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी साडेपंधरा लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. विशेष म्हणजे सदर आरोपी घरफोडी करण्यासाठी उत्तर प्रदेशातून विमानाने मुंबईत येत होता.
मुलुंड पश्चिम येथे महिन्याभरापूर्वी एका घरफोडी प्रकरणात घरातील सात लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले होते. याबाबत तक्रारदारांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सराईत आरोपी राजेश राजभर (३२) याने ही घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, हा आरोपी कळवा परिसरात एका भाड्याच्या खोलीत काही दिवसांपासून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी त्याला अटक केली.
राजभर हा मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून घरफोडी करण्यासाठी तो विमानाने मुंबईत येत होता. यापूर्वी त्याने मुंबईतील अनेक भागात घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून साडेपंधरा लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.