मुंबई : बॅगमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य असल्यामुळे अतिरिक्त शुल्क भरावे लागू नये म्हणून आपल्याकडे बॉम्ब असल्याचा बनाव करून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ उडविणाऱ्या एका महिलेला सहार पोलिसांनी अटक केली. ही महिला मुंबई विमानतळावरून कोलकत्याला जाण्यासाठी विमानात बसण्याच्या तयारीत होती. आरोपी महिलेला न्यायालयापुढे हजर केले असता तिची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. रुचा शर्मा असे महिला प्रवाशाचे नाव आहे. त्या सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पाईस जेटच्या विमानाने कोलकात्याला जात होती.
हेही वाचा >>> वांद्रे रेक्लमेशनमध्ये ‘मुंबई आय’ उभारण्यास स्थानिकांचा विरोध; रहिवाशांच्या विरोधानंतर प्रकल्प हलविण्याचा एमएमआरडीएचा निर्णय
विमानतळावर दाखल झाल्यानंतर शर्मा चेक इन काउंटरवर आल्या. त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. त्यांचे वजन २२ किलो होते. देशांतर्गत विमान प्रवासासाठी १५ किलो वजनाची मर्यादा असल्यामुळे अतिरिक्त वजनासाठी शर्मा यांना शुल्क भरावे लागेल, असे सांगण्यात आले. शर्मा यांनी शुल्क भरण्यास नकार देत स्पाईस जेटच्या महिला कर्मचाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी शर्मा यांनी कर्मचाऱ्यांविरोधात भाषिक टिप्पणीही केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी मुथु कुमार यांना बोलावून घेतले. त्यांनी आपण सीआयएसएफमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर शर्माने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुथु कुमार यांनी श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर बॅग उघडून तपासली असता त्यात काहीच सापडले नाही. या प्रकरणामुळे विमानतळावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे पोलीस पथक दाखल झाले. विमान कर्मचारी धनश्री वाडकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३३६, ५०५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून शर्मा यांना अटक केली. याप्रकरणी शर्मा यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली.