कालिना येथील काँग्रेस नगरसेवक ब्रायन मिरांडा यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकाविणाऱ्या सचिन खांबे, सचिन शेटय़े या दोघांना शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
नगरसेवक मिरांडा यांना एप्रिल महिन्यात सचिन खांबे याने फोन करून २५ लाखांची खंडणी मागितली होती. आपण नाशिक कारागृहातून बोलत असल्याचे त्यांनी सागितले होते.
सुरुवातीला ही मस्करी असल्याचे बऱ्याच जणांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी या फोनकडे दुर्लक्ष केले. यानंतर पुन्हा सचिन शेटय़े याचा मिरांडा यांना फोन आला व त्याने २५ लाखांची खंडणी मागितली. काही दिवसांनी पुन्हा ७ मे रोजी सचिन शेटय़े याने मिरांडा यांना फोन केला. हा शेवटचा कॉल असून २५ लाख रुपये दिले नाहीत तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. १० मे रोजी मी ठाणे न्यायालयात येणार असून त्या वेळी मला भेट असे शेटय़े याने मिरांडा यांना फोनवर सांगितले. त्या वेळी मिरांडा यांनी पोलीस आयुक्तांसह गृहमंत्र्यांकडेदेखील लेखी तक्रार दिली.
या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी १० मे रोजी साध्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्यांसह मिरांडा यांच्यासोबत ठाणे न्यायालयात पाठविले. तेथे मिरांडा यांना सचिन शेटय़े भेटला. आम्हीच नाशिक कारागृहातून फोन केल्याचे त्याने सांगितले. १५ मे रोजी सचिन खांबे आर्थर रोड कारागृहात येणार असून त्याला भेटून २५ लाख रुपये देण्याचे शेटय़े याने मिरांडा यांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाकडून या दोघांचा ताबा मागितला होता. अखेर शुक्रवारी खंडणीविरोधी पथकाकडे या दोघांना सुपूर्द करण्यात आले. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या दोघांनी नेमके कारागृहातूनच फोन केले का तसेच या दोघांच्या मागे अन्य कुणी आहे का हे तपासात स्पष्ट होईल, असे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सांगितले.
नगरसेवकाकडे खंडणी मागणारे पोलिसांच्या जाळ्यात
कालिना येथील काँग्रेस नगरसेवक ब्रायन मिरांडा यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकाविणाऱ्या सचिन खांबे, सचिन शेटय़े या दोघांना शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. नगरसेवक मिरांडा यांना एप्रिल महिन्यात सचिन खांबे याने फोन करून २५ लाखांची खंडणी मागितली होती.
First published on: 01-06-2013 at 05:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police asking bribe from corporator were arresed