पहाटेच्या वेळी गस्त घालणाऱ्या एका पोलीस हवालदारावर आरोपीने बियरच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली. सचिन खताते (३२) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. जखमी अवस्थेतही त्याने हल्ला करून पळणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.
 कांदिवली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार सचिन खताते गुरुवारी पहाटे गस्तीवर होते. सकाळी सव्वाचारच्या सुमारास त्यांना एक रिक्षात बसलेल्या दोन इसमांची संशयास्पद हालचाल दिसली. त्यांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला. कांदिवलीच्या महात्मा गांधी रोडवर त्यांनी रिक्षा अडवून आतील दोघांना खाली उतरण्यास सांगितले. परंतु त्याचवेळी रिक्षात बसलेल्या एका आरोपीने बियरच्या बाटलीने खताते यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघांनी रिक्षा सोडून पळ काढला. मात्र रक्तबंबाळ अवस्थेतही खताते यांनी पळणाऱ्या सचिन मल्होत्रा (३५) या आरोपीला अटक केली. मल्होत्रा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, दरोडे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police attacked in kandivali