आयपीएल सामन्यांतील स्पॉट फिक्सिंग प्रकरण दिल्ली पोलिसांनी उघड केल्यानंतर सावध झालेल्या मुंबई पोलिसांनी अनेक सट्टेबाजांची चौकशी सुरू केली. या चौकशीत या बुकींकडून पोलिसांनाच हप्ते दिल्याची बाब समोर आली आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी अमुक रकमेची मागणी केली, असे आरोप झाल्यानंतर आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सट्टेबाज आणि पोलीस यांच्यातील मधूर संबंध लपून राहिलेले नाहीत. कुठल्याही सामन्याच्या आधी सट्टेबाजांविरुद्ध कारवाई सुरू केली जाते. मुंबईतून बेटिंग हद्दपार झाल्याचा दावाही केला जातो. परंतु प्रत्यक्षात या सट्टेबाजांकडून मोठी तडजोड केली जाते, असे पोलीस दलात बोलले जाते. हे सट्टेबाज मग ठाणे किंवा नवी मुंबई परिसरातून कार्यरत असतात. यावेळीही आयपीएल सामन्यात मोठय़ा प्रमाणात बेटिंग घेतली जाते, याची कल्पना असलेल्या पोलिसांनी काही बुकींना चौकशीसाठीही बोलाविले होते. मात्र त्यांच्याकडून तडजोड केल्यामुळे आयपीएलमधील बेटिंगची मुंबई पोलिसांना कल्पना आली नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी आयपीएल सामन्यातील स्पॉट फिक्सिंग प्रकरण बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी विंदू दारासिंग तसेच इतर बुकींकडे मोर्चा वळविला. त्यानंतर पोलिसांनी बुकींची कसून चौकशी
केली.  यामध्ये अनेक पंटर्सनाही धमकावण्यात आल्याची चर्चा आहे. काही बुकींनी तर कुठल्या पोलिसाला किती रक्कम दिली हेही उघडपणे सांगितल्याचे कळते. याबाबत अघिकृत दुजोरा मिळू शकला नाही.