लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिलेल्या रुग्णालयांमध्येच ही तपासणी करणे आवश्यक आहे. मुंबई व कोकण विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ‘अपवादात्मक बाब’ म्हणून तीन खासगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहाय्य होणार आहे.

गृह विभागातील वय वर्षे ४० ते ५० या वयोगटातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्षे ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. ही तपासणी मान्यता प्राप्त रुग्णालये किंवा पोलिसांसाठी असलेल्या विशेष रुग्णालयांमध्येच करावी लागते. मुंबई विभागातील पोलिसांची वैद्यकीय तपासणी नागपाडा पालीस रुग्णालय, नायगाव उपपोलीस रुग्णालय आणि १२ दवाखान्यांमध्ये, तसेच काही सरकारी रुग्णालयांमध्ये केली जाते. मात्र आता यामध्ये आणखी तीन खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गृह विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई व कोकण विभागातील रुग्णालयांच्या यादीमध्ये नव्याने तीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

आणखी वाचा-नाहूरमध्ये पक्षीगृहाच्या प्रस्तावाला विरोध, पक्षीगृहाऐवजी अत्यावश्यक सुविधांची मागणी

या यादीमध्ये आता वाशी, अंधेरी (पूर्व) आणि नाशिक या तीन ठिकाणच्या अपोलो क्लिनिकचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही रुगणालयांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच या खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गृह विभागाकडून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास ‘अपवादात्मक बाब’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे गृह विभागागतील मुंबई व कोकण विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करता येणार आहे.

मुंबईमधील वैद्यकीय तपासणी केंद्र

नागपाडा येथील पोलीस विशेष रुग्णालयामध्ये ११४ खाटा उपलब्ध आहेत. तर नायगाव उप पोलीस रुग्णालयामध्ये ४० खाटा आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांना वैद्यकीय सहाय्य व तपासणीसाठी १२ दवाखाने उपलब्ध आहेत. ताडदेव, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसर, पंतनगर पोलीस ठाणे, सांताक्रुझ पोलीस ठाणे, कांदिवली पोलीस ठाणे, डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाणे, नेहरू नगर पोलीस ठाणे, वरळी पोलीस ठाणे, माहीम पोलीस ठाणे, अंधेरी पोलीस ठाणे, मरोळ व दादर पोलीस ठाणे येथे पोलिसांसाठी विशेष दवाखाने कार्यरत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police can conduct medical examination in three more hospitals mumbai print news mrj