मुंबई : विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी तक्रार करूनही क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासह अन्य आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. त्यामुळे, मुंबईच्या पोलीस आयुक्तांसह सात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी समाजमाध्यम प्रभावक सपना गिल हिने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.
सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादानंतर अंधेरी येथील एका पबमध्ये शॉ आणि अन्य आरोपींनी आपला विनयभंग केल्याचा सपना हिचा आरोप आहे. सेल्फीवरून झालेल्या वादाप्रकरणी सपना हिला २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. नंतर, तिची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर, सपना हिने शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. परंतु, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा न नोंदवल्याने सपना हिने महानगरदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. तिच्या तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकाऱ्यांनी ३ एप्रिल रोजी सांताक्रूझ पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून १९ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तथापि, पोलिसांवर कारवाई करण्याची सपना हिची मागणी दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे, सपना हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा : ‘टीबी’च्या औषधांचा तुटवडा; तीन महिने औषधे मिळणे मुश्किल, रुग्णांसाठी कसोटीचा काळ
या पोलीस अधिकाऱ्यांनी लोकसेवक म्हणून भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (विनयभंग) अंतर्गत दखलपात्र गुन्ह्यासाठी दिलेली माहिती नोंदवून घेणे आणि आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे होते. वारंवार मागणी करूनही आपल्या तक्रारीची पोलिसांकडून दखल घेतली गेली नाही. आपण पोलीस आयुक्तांशीही संपर्क साधला होता आणि त्यांच्याकडून या प्रकरणी हस्तक्षेप केला जाऊन शॉ व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी अपेक्षा होती, असा दावा सपना हिने पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करताना केला आहे.