भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रप्तिकर अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात आणि एमआयडीसी विभागाच्या पोलिस उपायुक्तांकडे ‘आम आदमी’ पक्षातर्फे सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे गडकरींनी अधिकाऱ्यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण चिघळण्याची शक्यता असून त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
गडकरी यांनी नागपूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांना ‘सत्तेवर आल्यावर बघून घेण्याची’ धमकी दिली होती. भाजपची सत्ता आल्यावर सोनिया गांधी, काँग्रेस किंवा इतर कोणीही वाचवू शकणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. गडकरींच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून त्यांनी इन्कारही केलेला नाही. त्यामुळे वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे ‘आम आदमी’ पक्षाचे निमंत्रक प्रफुल्ल व्होरा यांनी सोमवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
गडकरींना अध्यक्षपद पुन्हा मिळाले नाही, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना आपली जबाबदारी पार पाडताना धमकी दिल्याने गडकरींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा