ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या एका आरोपीला आवश्यक सवलती देण्यासाठी त्याच्या वडीलांकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या एका शिपायास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ठाणे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
संतोष पांडुरंग पवार (४०), असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून तो ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे. मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गुन्ह्य़ामध्ये पोलिसांनी सलोख कोपीकर याला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, कारागृहामध्ये त्याला आवश्यक सवलती देण्यासाठी संतोष पवार याने त्याचे वडील विवेक कोपीकर यांच्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी विवेक यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Story img Loader