मुंबई : तंबाखू व सुपारीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यवसायिकाकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पोलीस हवालदार विशाल यादव यांना अटक केली. यादव आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल विभागात कार्यरत आहेत.
तक्रारदारांचा तंबाखू व सुपारीचा व्यवसाय आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी, तसेच व्यवसायात मदत करण्यासाठी यादव यांनी पैशांची मागणी केली, असा आरोप आहे. याप्रकरणी एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, यादव यांनी व्यावसायिकाकडे प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयाची मागणी केली होती. ती रक्कम देण्याची इच्छा नसल्याने अखेर व्यावसायिकाने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने सोमवारी रचलेल्या सापळ्यात यादव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना एक दिवसांची कोठडी सुनावली, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली.