सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बुधेश रंगारी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या सत्र न्यायालयाने दिले आहेत. बुधेश रंगारी याला ७३ हजारांची लाच घेताना शुक्रवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडण्यात आले होते. तर घरझडतीच्या वेळी त्यांच्या घरात तब्बल १ कोटी २८ लाख रुपयांची रोकड आढळून आली होती.
शुक्रवारी रात्री रंगारी यांना अटक केल्यानंतर शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी लाच प्रकरणातील आरोपी असलेल्या रंगारी यांच्याकडे कार्यालयातील ब्रिफकेसमध्ये १ लाख १५ हजार रुपयांची तर त्यांच्या घरात १ कोटी २८ लाख रुपयांची रोकड सापडली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तर रंगारी यांच्या बेलापूर येथील एनकेजीएसबी बँकेतील लॉकरची तपासणी होणे बाकी असल्याचे सरकारी अधिवक्ता प्रसाद पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. रंगारी यांच्या मालमत्तेची तपासणी करण्यासाठी त्यांचे तपासकामात सहकार्य लागणार आहे. याशिवाय लाच स्वीकारताना रंगारी यांनी या लाचेच्या रकमेत वरिष्ठांचाही समावेश असल्याचा उल्लेख आला आहे. त्यामुळे त्याचा तपास लाचलुचपत विभागाला करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन रंगारी यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. विशेष सत्र न्यायाधीश एच. पाटील यांनी रंगारी यांना सहा नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
लाचखोर कार्यकारी अभियंत्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी
सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बुधेश रंगारी याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अलिबागच्या सत्र न्यायालयाने दिले आहेत.
First published on: 02-11-2014 at 04:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to bribe taking engineer