पोलिसांच्या कार्यवेळेच्या प्रायोगिक बदलाचा तपासकामात अडथळा
दिवसाचे १० ते १५ तास काम केल्यानंतर पुन्हा वेळ आली तर बंदोबस्ताला उभे राहायचे.. सततच्या बंदोबस्तामुळे दोन-दोन दिवस कुटुंबीयांचे तोंडच पाहायचे नाही.. डय़ुटी संपता संपता कुठे खून-दरोडा पडला तर घरी जाण्याचा विचार सोडून गुन्हेगाराच्या मागावर निघायचे.. वर्षांनुवर्षे या दुष्टचक्रात सापडलेल्या मुंबई पोलिसांना कुटुंबसौख्य मिळवून देण्यासाठी आठ तासांची डय़ुटी करण्याची योजना आखण्यात आली. या योजनेची प्रायोगिक अंमलबजावणी सुरू असलेल्या देवनार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होत आहे. परंतु, बंदोबस्ताच्या कामांसाठी योग्य असलेली ही ‘डय़ुटी’ तपासकामात मात्र अडसर ठरू लागल्याचे चित्र आहे.
पोलिसांच्या कामाचे तास आणि त्याचा कामावर, पोलिसांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविरोधात देवनार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडत पोलिसांनाही तीन पाळ्या असाव्यात, अशी मागणी केली होती. यावर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी देवनार पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास काम करण्यास संमती दिली. गेले महिनाभर या पोलीस ठाण्यात कामाचे तास आठ झाल्यापासून काही सकारात्मक बदल दिसून आले. कामाच्या मर्यादित तासांमुळे कामाच्या गुणवत्तेत काहीशी वाढ झाल्याचे वरिष्ठांचे निरीक्षण असून कुटुंबीयांनाही वेळ देता येत असल्याने कर्मचारीही खूश आहेत. ‘एखाद्या चौकीला आम्हाला बंदोबस्तासाठी पाठवले तर पुढच्या पाळीतील व्यक्ती येईपर्यंत अनेकदा १२ तासही होत. त्यानंतर घरी जाऊन कुटुंबीयांनाही वेळ देता येत नव्हता. पण आठ तासांच्या डय़ुटीमुळे खूपच फरक पडला असून कामाच्या गुणवत्तेबरोबर आमच्या कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल होत आहे,’ असे देवनार पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. या प्रयोगाच्या निष्कर्षांचा आढावा पुढील आठवडय़ात पोलीस आयुक्त घेणार आहेत.
दुसरीकडे तपासाच्या बाबतीत आठ तासांच्या डय़ुटीचा काही फायदा होत नसल्याचे चित्र आहे. एखादा गुन्हा घडला की त्याचा तपास सोपविलेल्या उपनिरीक्षक किंवा निरीक्षकाला स्वतला उपस्थित राहून सर्व तपास करावा लागतो, आठ तासांची डय़ूटी संपल्यावर तपास अधिकारी तो मध्येच सोडून जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यावर कसा तोडगा काढता येईल, याविषयी एका उपनिरीक्षकाने प्रश्न उपस्थित केला.
माजी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात बंदोबस्त आणि तपास याच्यासाठी दोन वेगळे विभाग असावेत, असा आदेश काढून ऑगस्ट, २०१५ पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचे पालन अजूनही झालेले नाही. जर अशा प्रकारे पोलीस दलाचे दोन वेगळे भाग अस्तित्वात आले तर पोलीसांच्या म्डय़ूटी आठ तास करणे सहज शक्य असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी स्पष्ट करतात.
१७९
देवनार पोलीस ठाण्याचे संख्याबळ
९०
आठ तासांच्या डय़ूटी लावलेले कर्मचारी
मे २०१६ पासून सुरू झालेला या प्रयोगामुळे अधिकारी-कर्मचारी यांच्यात समाधानकारक वातावरण आहे. मे-जून हा कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांचा कालावधी आणि तुलनेने बंदोबस्त आणि इतर घडामोडींच्या मानाने कमी ताणाचे महिने असतात, सणांना सुरुवात झाल्यानंतर हा प्रयोग खरोखरीच यशस्वी ठरतो का याचे चित्र स्पष्ट होईल.
– दत्तात्रय िशदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवनार पोलीस ठाणे</strong>