मुंबई : सहा वर्षांपूर्वी बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवून एका सायकलस्वाराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याच्या आरोपांप्रकरणी दोषी ठरवून कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सुनावलेली सहा महिन्यांची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. अपघातासाठी कारणीभूत ठरलेले वाहन आरोपी चालवत होता की नाही याचा तपासच पोलिसांनी केला नाही. त्यामुळे, आरोपीला अशा स्थितीत संशयाचा फायदा द्यावा लागेल, असे नमूद करून न्यायालयाने आरोपीची शिक्षा रद्द केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचिकाकर्ता प्रसेनजीत सेन याला महानगरदंडाधिकारी न्यायालयाने त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून २०२१ मध्ये सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेवर सत्र न्यायालयाने २०२३ मध्ये शिक्कामोर्तब केले. त्याविरोधात सेन याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने उपरोक्त निरीक्षण नोंदवताना महानगरदंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाचा सेन याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्याचा निर्णय रद्द केला.

हेही वाचा – समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी करण्याच्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळणार, पीयूष गोयल यांच्या घोषणेमुळे राजकीय पेच दूर

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, सेन याने १७ मार्च २०१८ रोजी बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवून पुण्यातील जय गणेश साम्राज्य चौकाजवळ एका सायकलस्वाराला धडक दिल्याने सायकलस्वार बच्छालाल पाल जखमी झाला. सेन आणि त्याच्यासह त्यावेळी गाडीत असलेले त्याचे मित्र शुभंकर बैरानी, उत्तरा राशिनकर आणि भूमिका शर्मा यांनी बच्छा लाल याला तातडीने रुग्णालयात नेले. त्यानंतर, तीन दिवसांनी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बच्छालाल याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सेन याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावरील सुनावणीच्या वेळी, अपघाताच्या वेळी सेन कार चालवत होता हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचा दावा त्याचे वकील सत्यव्रत जोशी यांनी केला. अपघातग्रस्त गाडी ही भाड्याने घेण्यात आली होती. त्यामुळे, ती चालकासह उपलब्ध करण्यात आली होती की नाही हे स्पष्ट झालेले नाही. शिवाय, बच्छालाल याचा पुतण्या रामसावरे याच्या एकट्याच्या साक्षीवर पोलिसांचा खटला आधारित असून त्याच्या साक्षीतही अनेक विसंगती असल्याचे जोशी यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे, आरटीओच्या अहवालात गतीनियंत्रकाने (स्पीड गव्हर्नर) सुसज्ज असलेल्या कारचे फक्त किरकोळ नुकसान झाल्याचे सूचित करण्यात आले होते. त्यामुळे, गाडी वेगाने चालवण्यात आल्याच्या दाव्याचेही सेन याच्यावतीने खंडन करण्यात आले.

म्हणून आरोपीला संशयाचा फायदा

न्यायमूर्ती जाधव यांच्या एकलपीठानेही सेन याची शिक्षा रद्द करताना फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांत अनेक त्रुटी असल्याचे नमूद केले. तपास अधिकाऱ्याने अपघातग्रस्त गाडी भाड्याने घेण्यात आल्याचे, परंतु ती चालकासह उपलब्ध करण्यात आली होती की नाही याची चौकशी केली नसल्याची बाब साक्ष देताना मान्य केली. याव्यतिरिक्त, कार भाड्याने देणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीने देखील सेन याच्याविरोधात जाईल असा पुरावे सादर केला नाही. त्यामुळे, फिर्यादी पक्षाने गाडी चालकासह उपलब्ध करण्यात आली होती की नाही यादृष्टीने ठोस पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले.

हेही वाचा – थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे

प्रमुख साक्षीदाराच्या साक्षीत विसंगती

न्यायालयाने रामसावरे याच्या साक्षीतील विसंगतीकडेही आदेशात लक्ष वेधले. त्याने साक्षीत अपघातानंतर कारमधून तीन पुरुष आणि दोन महिला बाहेर पडल्याचे सांगितले होते. याचिकाकर्ता आणि त्याचा मित्रवगळता तिसऱ्या पुरुषाबाबत काहीच नमूद नसल्याचे न्यायालयाने म्हटले. या सगळ्या बाबींचा विचार करता सेन हा अपघाताच्या वेळी गाडी चालवत होता याची चौकशी पोलिसांनी केली नाही. त्यामुळे, त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला अपयश आले असून अशा परिस्थितीत सेन याला संशयाचा फायदा द्यावा लागेल, असे न्यायालयाने नमूद केले व सेन याची सहा महिन्यांची शिक्षा रद्द केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police failed to prove that the accused was driving the car the conviction was quashed mumbai print news ssb