मुंबई : विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली होती. स्वागतयात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गिका बंद केल्या होत्या. यामुळे पर्यायी मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा पहायला मिळाला. सकाळी विधिमंडळ अधिवेशन व क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. स्वागतासाठीच्या गर्दीत १४ जण किरकोळ जखमी झाले.

संघाचे स्वागत करण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मरिन ड्राइव्ह परिसरात आले होते. चर्चगेट रेल्वे स्थानकापासून वानखेडे स्टेडियममध्ये जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारपासूनच गर्दी केली होती. स्टेडियममध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. मात्र यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

नरिमन पॉइंट ते मरिन ड्राइव्हपर्यंत भारतीय संघाची बसमधून मिरवणूक काढण्यात आली. प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. चर्चगेट रेल्वे स्थानकावरही रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान चाहत्यांना गर्दी न करण्याचे आवाहन देत होते.

हेही वाचा >>>राज्यातील २२ केंद्रांवर ७ जुलै रोजी लेखी परीक्षा

शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरातील बहुतेक मुख्य रस्ते बंद करावे लागले. तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. जवळपास पाच हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. वानखेडे स्टेडियमध्ये तीन स्तरांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मरिन ड्राइव्ह येथे जमलेल्या उत्साही चाहत्यांमुळे या परिसरातील कार्यालयांतून घरी परतताना नोकरदार, व्यावसायिकांचे हाल झाले. गुरुवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतून पश्चिम आणि पूर्व उपनगरात जाणाऱ्या नोकरदारांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेटकडे जाणारे रस्ते पादचाऱ्यांनी आणि दुचाकींमुळे गजबजलेले होते. तसेच चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकात जाण्यासाठी टॅक्सी नव्हत्या. रात्री आठ नंतरही दक्षिण मुंबईतील रस्ते गुरुवारी गजबजलेले होते. पश्चिम उपनगरात जाणारे प्रवासी मरिन लाइन्स स्थानकातही येत होते. या स्थानकातील सर्व फलाटांवर प्रचंड गर्दी होती.

रूळ ओलांडण्याचा प्रकार

मुंबई महानगरातून क्रिकेटप्रेमी वानखेडे स्टेडियमच्या वाटेने जात होते. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमी रेल्वेमार्गाने चर्चगेट स्थानकात आले. त्यामुळे दुपारच्या सुमारास चर्चगेट स्थानकात प्रचंड गर्दी जमा झाली. त्यामुळे लोकलने चर्चगेट स्थानकात उतरलेल्या क्रिकेटप्रेमींनी थेट रेल्वे रूळ ओलांडून फलाट बदलला. शेकडो जणांनी असा धोकादायक मार्गाचा अवलंब केला. यावेळी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गर्दीचे नियोजन, विभाजन केले.

रूळ ओलांडण्याचा प्रकार

मुंबई महानगरातून क्रिकेटप्रेमी वानखेडे स्टेडियमच्या वाटेने जात होते. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमी रेल्वेमार्गाने चर्चगेट स्थानकात आले. त्यामुळे दुपारच्या सुमारास चर्चगेट स्थानकात प्रचंड गर्दी जमा झाली. त्यामुळे लोकलने चर्चगेट स्थानकात उतरलेल्या क्रिकेटप्रेमींनी थेट रेल्वे रूळ ओलांडून फलाट बदलला. शेकडो जणांनी असा धोकादायक मार्गाचा अवलंब केला. यावेळी रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गर्दीचे नियोजन, विभाजन केले.

प्रथम ऊन, नंतर पाऊस

दुपारी २ वाजेपासून मुंबई महानगरातून क्रिकेटप्रेमी नरिमन पॉइंट, वानखेडे स्टेडियमवर जात होते. यावेळी दुपारी ४ वाजेपर्यंत कडक ऊन पडल्याने, घामाघूम झालेला क्रिकेटप्रेमींना दुपारी ४ नंतरच्या जोरदार पावसाच्या सरींनी ओलेचिंब केले. त्यामुळे धावपळ करणाऱ्या क्रिकेटप्रेमींचा वेग थोडा मंदावला.

भाजपची ठिकठिकाणी फलकबाजी

भारतीय संघाच्या स्वागतासाठी भाजप युवा मोर्च्याकडून ठिकठिकाणी फलकबाजी झाली. तसेच विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने, विविध पक्षांचे कार्येकर्तेही जल्लोषात सहभागी झाले होते.

वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश

वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश असल्याने, स्टेडियम खचाखच भरले होते. मुंबई महानगरातून येणारा प्रत्येक क्रिकेटप्रेमी वानखेडे स्टेडियमवर जात होता. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त क्रिकेटप्रेमी त्याठिकाणी जमा झाले होते.

चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

●मुंबईत हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी धक्काबुक्की करत नरिमन पॉइंट, वानखेडे स्टेडियमवर पोहोचत होते. तर, नरिमन पॉइंट परिसरात हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी जमले होते.

●काही ठिकाणी धक्काबुक्की झाल्याने, अनेकजण एकमेकांच्या अंगावर पडले होते. मात्र, सुरक्षा कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचून, गर्दीवर नियंत्रण मिळवून, एकमेकांच्या अंगावर पडलेल्या क्रिकेटप्रेमींना बाजूला सारले.

१४ जण जखमी क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत १४ जण किरकोळ जखमी झाले. त्यातील ११ जणांवर जी. टी. रुग्णालयात उपचार करण्यात आले. एका व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. सर्व रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तसेच एका वृत्तवाहिनीचे कॅमेरामन सुनील वर्मा यांच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नायर रुग्णालयात दोघांना उपचार करून घरी सोडण्यात आले.