मुंबईः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोमवारी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली. तेथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ‘‘जे’ औरंगजेबालाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ कफ परेड येथील पन्हाळगड या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी निवासस्थानात बेकायदा प्रवेश करून दगडफेक केली. त्यात निवासस्थानाच्या समोरील बाजूची खिडकीची काच फुटली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना हटवले. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र मुरारी यांच्यासर १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील १४ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. उर्वरीत चार महिला आरोपी असल्यामुळे त्यांना रात्री अटक करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली असून तक्रारीनुसार सर्व कार्यकर्त्यांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.