मुंबईः मानखुर्द टी जंक्शन येथे पोलिसालाच रिक्षाचालकाने रिक्षासोबत फरफटत नेल्याचा गंभीर प्रकार घडला. या घटनेत पोलिसाच्या गुडघा व हाताला जखमा झाल्या आहेत. त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता त्याने रिक्षा न थांबवता पोलिसाला फरफटत नेले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे
तक्रारदार लक्ष्मण मधुकर मोझर (५०) नवी मुंबईतील रहिवासी असून ते सध्या पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नाकाबंदीच्या कामासाठी मानखुर्द स्थानकाकडून आयओसी जंक्शनतकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी ते तैनात होते. त्यावेळी त्यांनी तेथे एक रिक्षा येताना पाहिली. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्याचा इशारा केला. पण रिक्षाचालक थांबला नाही. त्यावेळी मोझर यांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली असता आरोपीने थेट रिक्षाचा वेग वाढविला.
हेही वाचा >>> …त्याच्या नशिबी आता आजीवन बंदीवासच
काही अंतर तक्रारदार मोझर रिक्षासोबत फरफटत गेल्यानंतर त्यांची पकड सुटली आणि ते खाली कोसळले. यावेळी त्याच्या डाव्या गुडघ्याला व उजव्या कोपराला दुखापत झाली. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणानंतर मोझर यांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, भरधाव वेगाने रिक्षा चालवणे व पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सदर रिक्षाचालकाच्या रिक्षाचा क्रमांक पोलिसांना मिळाला असून त्याद्वारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.