मुंबई : करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर दोन वर्षांनी मुंबईत प्रथमच मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत असून वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १० हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय विसर्जन सोहळ्याच्या दिवशी मुंबईत ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्ते ठेवण्याची तयारी केली आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट, पवई या महत्त्वाच्या विसर्जनस्थळी मुंबई शहर वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकांच्या मार्गात अडथळा येऊ नये यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस विभाग, महानगरपालिका यांच्याकडून लहान-मोठया क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेश विसर्जनादरम्यान भाविकांना वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी प्राथमिक उपचार केंद्रे सज्ज ठेवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १० हजार ६४४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार, होमगार्ड, ट्राफिक वॉर्डन, नागरी संरक्षण दल तैनात करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलीसांना वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनाही मदत करणार आहेत.
विसर्जनासाठी मार्गांमध्ये बदल
मुंबईत दीड दिवस, पाचवा दिवस (४ सप्टेंबर), गौरी-गणपती (५ सप्टेंबर), सातवा दिवस (६ सप्टेंबर) व अनंत चतुर्दशीला (९ सप्टेंबर) मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकांमुळे ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात येणार आहेत, तर ५७ रस्त्यांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. याशिवाय ११४ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.