दूरध्वनीवरुन लाभांशाचे आमिष दाखवून लुटणारी टोळी कार्यरत

तुमची विमा पॉलिसी परिपक्व  झाली असून त्याचा लाभांश द्यायचा आहे, त्यासाठी लाभांशाच्या अमुक टक्के भरा, असा दूरध्वनी, भ्रमणध्वनी तुम्हाला आला तर सावध व्हा! कारण, पॉलिसीधारकांच्या गुंतवणुकीची इत्थंभुत माहिती मिळवून त्या आधारे गंडा घालणारी एक टोळी मुंबईत कार्यरत असल्याचे नुकत्याच एका प्रकरणात पुढे आले आहे. अशाप्रकारे लाभांशाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या सध्या तरी मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. परंतु, या म्होरक्याच्या चौकशीत पॉलिसीधारकांची महत्त्वपूर्ण माहिती या टोळीकडे असल्याचे उघडकीस आले आहे.

गावदेवी परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला जून, २०१५ मध्ये भ्रमणध्वनी आला. ‘तुमची पॉलिसी परिपक्व झाली असून त्यावर तुम्हाला सव्वा चार लाख रुपयांचा लाभांश देणे आहे. त्यासाठी तुम्हाला लाभांशाच्या काही टक्के रक्कम भरावी लागेल,’ असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. आपल्या पॉलिसीबद्दल सर्वप्रकारची माहिती तो सांगत असल्याने महिलेचाही त्याच्यावर विश्वास बसला. मग, थोडे थोडे करत महिला आणि तिच्या पतीने तब्बल तीन लाख ३२ हजार रुपये रक्कम फोनवरून सांगण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये भरली. दुसऱ्या एका कंपनीची आणखी एक पॉलिसी आणि हॉलिडे पॅकेजच्या नावावर त्यांना हा गंडा घालण्यात आला. कालांतराने समोरून आणखी रक्कम भरण्यास सांगण्यात येऊ लागले. त्यावेळी मात्र दाम्पत्याला शंका आली आणि त्यांनी तातडीने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी दाम्पत्याला आलेल्या भ्रमणध्वनीची, तसेच बँक खात्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. लाभांशासंबंधित पुन्हा फोन आला की आम्हाला तातडीने कळवा अशी सूचना पोलिसांनी दाम्पत्याला केली होती. मार्च, २०१६ मध्ये पुन्हा दाम्पत्याला फोन आला. लाभांश जमा करण्यासाठी आणखी काही रकमेची पॉलिसी विकत घ्यावी लागेल, असे पलीकडील व्यक्ती सांगत होती. ज्येष्ठ महिलेने पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे म्हणणे मान्य करत रक्कम भरण्यासाठी म्हणून बँक खातेक्रमांक मिळवला. ज्या क्रमांकावरून भ्रमणध्वनी आला त्याचा तपास करत सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव पाटील, हवालदार पवार, कदम वाडते, अतिग्रे यांनी सुमीत सुहाग (वय २५) याला हरियाणा येथील भिवानी येथून अटक केली. त्याच्याकडून मिळालेली माहिती ही खरोखरीच धक्कादायक होती.

सुमीत याची मत्रीण एका कॉल सेंटरमध्ये कामाला असून तिच्याकडे विमा पॉलिसी परिपक्व झालेल्या मुंबईसह अन्य शहरातील ग्राहकांची माहिती होती. कोणत्या ग्राहकाने किती रकमेची पॉलिसी काढली असून ती कधी परिपक्व होणार याविषयी सविस्तर माहिती त्यांच्याकडे आढळून आली, असे गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताजी भोपळे यांनी सांगितले.

सुमीतने अशा प्रकारे आणखी तीन जणांना फसविल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. पॉलिसी परिपक्व झालेल्या व्यक्तीला फोन करून त्याच्या पॉलिसीविषयी सर्व माहिती द्यायची. जेणेकरून त्या व्यक्तीचा विश्वास बसला की त्याला लाभांशाचे आमिष दाखवून त्याच्याकडून पसे उकळायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती होती.

पोलिसांचा सावधानतेचा इशारा

या प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांनी पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. खरेतर कुठलीही विमा कंपनी दूरध्वनीवरून तुमच्याशी संपर्क साधत नाही. जरी कुणी साधला तर ज्याच्याकडून आपण पॉलिसी घेतली त्या मध्यस्थाला त्याविषयी विचारणा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Story img Loader