चेंबूर येथे सार्वजनिक शौचालयात एका अल्पवयीन मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे मुंबईत गुरूवारी खळबळ माजली होती. परंतु घरी येण्यास उशीर झाल्यामुळे पालकांचा ओरडा पडू नये यासाठी या मुलीने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव केला होता, असे नंतर उघड झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र या घटनेबाबत पोलीस मौन बाळगून आहेत.
चेंबूर येथील साईनाथ नगर झोपडपट्टीत ही मुलगी राहते. १५ वर्षांच्या या मुलीला आरोपी बुधवारी दुपारी या परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहात घेऊन गेले. तेथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यावर मुलीने खाणाखुणांद्वारे तिच्यावर गुदरलेली परिस्थिती आईकडे कथन केली.
आईने तात्काळ पोलिसांत जाऊन याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाल्याने या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी या परिसरातील काही व्यक्तींना ताब्यातही घेतले. मात्र नंतर या मुलीने तिचा जबाब बदलला. आपल्या मित्राबरोबर फिरावयास गेली होती. त्यामुळे घरी येण्यास उशीर झाल्यामुळे पालकांचा ओरडा मिळू नये यासाठी आपण बलात्काराचा बनाव केल्याचा खुलासा तिने केला, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेच्या सत्यतेबाबत विचारणा करण्यासाठी उपायुक्त लख्मी गौतम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Story img Loader