एकीकडे मुंबईत डान्स बार सुरू होऊ नयेत यासाठी राज्य सरकार न्यायालयात खेपा मारत असतानाच शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या ‘सायलेंट बार’चे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या भरवस्त्यांमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या या सायलेंट बारमध्ये नृत्य सोडले तर सर्व प्रकारची अश्लील कृत्ये होतात; पण या बारच्या विरोधात तक्रारी येत नसल्यामुळे कारवाईस अडचणी येत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी चेंबूरच्या सिंधी कॅम्पमध्ये एका बारवर समाजसेवा शाखेने धाड टाकली. यात प्रत्येक टेबलाभोवती आडोसे निर्माण करून अश्लील चाळे करणाऱ्या गिऱ्हाईकांकडून दंड आकारत ५-६ मुलींवर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर दहिसर येथेही अशाच प्रकारे सुरू असलेल्या बारवर धाड टाकून पोलिसांच्या समाजसेवा शाखेने कारवाई केली. गेल्या दीड महिन्यात पोलिसांनी अशा तीन बारवर छापे टाकून कारवाई केली आहे.
वेश्या व्यवसाय आणि डान्स बार यांच्यामधला टप्पा म्हणजे सायलेंट बार असे आपण म्हणू शकतो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अशा बारमध्ये वेटर म्हणून महिला काम करतात, त्यांना स्पर्श करण्याबरोबरच त्यांना बाजूला बसवून त्यांच्याबरोबर अश्लील चाळे अशा बारमध्ये करण्याची मुभा असते. आंबटशौकिनांचा अड्डा असलेले हे बार बहुतांश वेळी दिवसाच सुरू असतात, त्यामुळे स्थानिक पोलिसांचाही याच्याकडे कानाडोळा होतो, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. चारशे ते पाचशे रुपये जास्तीचे भरून बारमध्येच केलेल्या वेगळ्या विभागात ग्राहकांना प्रवेश मिळतो. मुंबईमध्ये अशा प्रकारे किती बार सुरू आहेत, याचा अंदाज लावणे कठीण असून अशा बारवर कारवाई केल्यानंतर केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ प्रमाणे कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे एका पोलिसाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा